Monday, 20 May 2013
कोमेजलेलं बालपण
"काय जेवलास रे ? " एकदम साधा सरळ आणि सोपा प्रश्न होता. तसा नेहमीच्या दैनंदिन जीवनात सहज चौकशी करण्या साठी वापरण्यात येणाऱ्या काही प्रश्नान पैकी हा एक प्रश्न. नेहमी विचारतो मी सर्वाना. मग फोन वर असू दे किवा प्रत्यक्ष भेट झाली तरी. त्याला हि नेहमी प्रमाणे विचारले "काय जेवलास रे"? त्या वर तो दोन मिनिटे शांत मला काही उमजेना म्हणून परत विचारले "अरे ऐकले नाही का? काय जेवलास तू ?" कोणत्या विचारत तो होता काय माहित. मी विचारलेल्या त्याच प्रश्नाने त्याला कदाचित जाग आली. "हा मी ना मी ते ते छोले असता ना ते आणि भात खाल्ला". मनुष्याचा चेहेरा त्याच्या मनाचे उत्तम प्रतिबिंब असतो. त्याच्या मनातील एकंदरीत भाव त्याच्या चेहेऱ्या वरून स्पष्ट दिसत होते. आणि पुन्हा मला त्याच निराशेने घेरले. त्याचा तो केविलवाणा चेहेरा पाहून मलाच कसंतरी झाले. राहवले नाही म्हणून मी सहज विषयाला हात घातला "काय रे हे जे काही तू आत्ता खाल्लं ते तुला आवडलं का? भरलं का पोट तुझे ?" या वर तो पुन्हा दोन मिनिटे निर्रुतर. उगाच मला काही तरी वाटेल मी काही तरी वेगळा विचार करेन म्हणून तो एकदम खात्रीशीर बोलला "हो मग आवडले ना रे दादा". चेहेरा सर्व काही बोलत होता उगाच जास्त प्रश्न विचारून तो गांगरून जाईल म्हणून मी काही बोललो नाही.
वय वर्ष १४. अगदी वाढत्या वयाला झालेली सुरुवात. नुकतेच फुटलेल मिसरूड. वाढत्या वयातील भूक आपण सर्व जाणतोच. त्याचा चेहेरा काही वेगळेच बोलत होता. दादा नकोय मला हे सर्व आता असह्य्य झालंय रे. अनाथ म्हणून मिळालेला शाप आणि उगाच दुसर्यांकडून चांगुलपणा दाखवण्या साठी मिळालेली सहानभूती नकोय रे हे सर्व. घेवून चल मला तुझ्या सोबत. जगू दे मलाहि तुझ्या सारखंच स्वच्छंदी. कोणतीच सीमा कोणतीच मर्यादा नकोय मला. जे मनात येईल ते करायचं आहे. शाळा अभ्यास मित्र हे सर्व आहे रे पण त्या पलीकडे हि शाळेतून घरी आले कि लाडाने माया करणारी, मायेच्या पदराआड घेवून छान कुरुवाळनारी, लाडू देणारी, माझा अभ्यास घेणारी आई देशील का रे? खेळत असताना बाबा आले आहेत रे चल पटकन म्हणून हाक मारणारी आई कुठे मिळेल रे?? घरी पळत येताना आज बाबा काही तरी घेवून आले असतील असे कधी वाटेल का रे मला? वडिलांचा तो दरारा तो राग आणि थोडा मार मग परत मार दिला म्हणून झोपेतच साश्रू नयनांनी पायाला तेल लावणारे आई बाबा मिळतील का रे मला?? मलाही आई सोबत बाहेर जायचंय तिच्या सोबत गप्पा मारायच्या आहेत. काय करू रे मी सांग ना दादा काय करू रे? मी काय अपराध केला म्हणून मला हि शिक्षा. त्याच्या ह्या चेहेर्या वरच्या प्रश्नांनी मी निरुत्तर होत होतो. आमचा हा मूक संवाद बराच वेळ चालू होता. तो प्रश्ना मागून प्रश्न विचारात होता आणि मी फक्त निर्रुतर शून्य नजरेने त्याच्या कडे बघत होतो.
बरेच दिवस न मिळालेला वेळ, अक्षयतृतीयेला नील चे ह्या विश्वात झालेले आगमन ह्या कारणांनी मी तिथे गेलो. त्या दिवशी मुले बाहेर गेली आहेत फार थोडी मुले आहेत असे कळले. तरी देखील आमच्या विनंतीला मान देत व्यवस्थापकांनी मुलांना भेटण्यास मुभा दिली. ते तिघेच होते. त्यातील दोघे तर अगदीच पिटुकले एक ४थी मध्ये तर एक ५वी मध्ये. जो सर्वात मोठा होता त्याच्याशीच हा सवांद झाला. उन्हाळ्याच्या सुट्टीचे दिवस, मामाचे गाव, तिथे केलेली धमाल, आंबे चिंचा हे सर्व आठवले. कोण ह्या मुलांचा मामा? कसला मामा न कसला काय जन्माला आल्या पासून अनाथ हा शाप घेवून आला दिवस पुढे ढकलत ह्यांचे बालपण पुरे कोमेजून गेले.
कसला असेल तो भात आणि ती छोले ची भाजी त्या मध्ये काही सत्व असेल का ? गरमा गरम मेतकुट आणि मस्त तूप वाढणारी आई ह्या मुलांना कोण देईल का? आई चे महत्व काय हे मला तिथे जावून जरा जास्तच कळले. अगदी मागच्याच वेळेची गोष्ट खेळता खेळता एका मुलाला लागले भरपूर रडला तो आणि मग अचानक स्वतःहून उठून लागलेली जखम स्वच्छ करण्या साठी नळाखाली गेला. हे सर्व दृश्य बघून देखील काहीच करू शकत नव्हतो. माझ्या बाळाला लागलाय म्हणून धावत पळत येवून मायेने त्या जखमेवर फुंकर घालणारी आई कोण देईल माझ्या मुलांना? कोणी बघत नाही न कोणी विचारात नाही म्हणून स्वतःउठून आपणच त्या जखमेवर फुंकर मारायची आणि परत शांत मनाने उठून इतरांच्यात सहभागी होवून खेळायचे. या मध्ये त्या बालमनावर काय आघात होत असतील किती कोमेजून जात असेल ते मन हा विचार देखील फार अस्वस्थ करून टाकतो कधी कधी.
मला खरंच काही कळत नव्हते. संदीप फक्त त्यांच्या कडे बघत होता. वयाच्या १४व्या वर्षीच त्याने अगदी मोठ्या माणसा सारखे दाखवलेलि वागणूक मला उगाच निराशा देवून गेली. इतक्या लवकर हि maturity. नको नको नको देवा. त्याने पण त्याचे बालपण अनुभवायला हवच. पण मी काहीच करू शकत नाही ह्या गोष्टीचे मला फार दुक्ख होते. अगदी न चुकता गाणे म्हणण्याचा आग्रह ते सर्व करतात आणि त्यांना अजिबात निराश करायचे नाही म्हणून मी अगदी ते सांगतील ते गाणे म्हणतो. पूर्ण जरी देता येत नसला तरी थोडा वेळ तरी त्यांना आनंद मिळावा, त्यांच्या रोजच्या जीवनातून काही तरी वेगळे वाटावे हीच त्या मागची भावना.
जेव्हा जेव्हा मी आश्रमात जातो मला तीच निराशा घेरून टाकते. मन अगदी सुन्न होते. त्यांची सहानभूती वाटून घेण्याखेरीज त्यांच्या सोबत चांगला वेळ घालवण्या खेरिज माझ्या हातात तरी काय आहे? मी काय करू जेणे करून ह्या मुलांना मध्ये हि अशी भावना कधीच तयार नाही होणार. फक्त देण्याघेण्या खेरीज मी आज पर्यंत त्यांच्या साठी काहीच केले नाही. उत्तरं शोधण्याचा खूप प्रयत्न करत आहे पण अजूनही काही मिळत नाही. त्याच निराशेवर मग काही तरी अशेच किरण मी शोधतो आणि माझ्याच मनाची मी समजूत घालतो. जे होते ते चांगल्या साठीच होते.
बाळानो तुम्ही खूप गुणी आणि समजूतदार आहात. तुम्हाला खूप मोठा व्हायचं आहे कारण तुम्ही खूप वेगळे अहात. अनाथ म्हणून नाही तर तुम्हाला देवाने फार लहान वयात कणखर बनवल आहे. सतत देवाचे आभार माना. कारण त्याच्या मुळेच आपण सर्वजण हे विश्व बघत आहोत. कुठली कसली हि अडचण आली तरी मी, नंदू दादा, संदीप दादा आम्ही सर्व आहोत. आम्ही कायम तुमच्या सोबत आहोत. तुम्हाला खूप मोठा व्हायायचं आहे आणि आम्ही तिघेही तो दिवस बघणार आहोत. आम्ही तुमच्या साठी स्वप्न पाहत आहोत अगदी आई वडिलांप्रमाणे. आम्ही आहोत फक्त हाक मारा. असा आधार देण्या खेरीज मी दुसरे काहीच करू शकलो नाही.…… कदाचित ह्या मधूनच त्यांना जगण्याचे नवे बळ, नवे पंख फुटतील आणि उंच अश्या ह्या आकाशात माझी हि मुले खूप मोठी भरारी घेतील.
क्षितीज
२० मे २०१३
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment