Saturday, 20 September 2014

प्रयत्न


तसा रविवारचा दिवस म्हणजे एक निवांतपणा घेवून येणारा दिवस. अगदी सकाळी उठण्यापासून ते दुपारचे जेवण असो वा रात्रीचे जेवण. एकंदरीतच मनात देहात आळस भरलेला असतो खरा तरी देखील त्यातूनही काही कामं करण्यासाठी वेळ हा काढलाच जातो.
अश्याच काही अनिच्छेने मला आई रविवारी तिच्यासोबत काही कामा निम्मित घेवून गेली. सहजच रविवारी फलटण चा बाजार असल्या कारणाने सर्व स्तरातील लोकांचे दर्शन घडते हे मात्र खरे. तसे लोकांचे निरीक्षण करणे हा माझ्या मते तरी एक प्रकारचा गुन्हा आहेच तरीदेखील समोरच्या व्यक्ती कडून काही शिकायला मिळते का म्हणत मी हा गुन्हा नेहमी करतोच. आई मेडिकल मध्ये तिची औषध घेत होती मी आपला नेहमी प्रमाणे गाडी वर बसून होतो.
तेवढ्यात तो तिथे आला. दाढी तशी वाढलेलीच. पायात एक साधी स्लीपर. एकंदरीतच त्याच्याकडे बघून तो सामोरे जात असलेल्या अठरा विश्व दारिद्र्याची कल्पना आली. सायकल वरून जात असताना अचानक तो थांबला. मला कळलेच नाही अचानक असा तो का थांबला ते. खाली उतरून तो काही तरी शोधू लागला आणि मग माझ्या लक्षात  आले कि त्याच्या सायकल चा पेडल  तुटला आहे. मी सहज म्हणून त्या कडे एक निरीक्षण टाकले. तो पेडल काहीहि झाले तरी दुरुस्त होणार नाही अश्या रीतीने तुटला होता. तरीदेखील त्याची तो पेडल बसवण्याची चालू असलेली धडपड मला बरेच काही शिकवून गेली. एकंदरीतच काय तो हार मानायला तयार नव्हता. बरेच प्रयत्न करून देखील यश मिळत नाही म्हटल्यावर देखील त्याने तो पेडल बरोबर घेतला. आणि तश्याच अवस्थेत सायकल घेवून त्याच्या वाटेवर मार्गक्रमण करू लागला.  साहजिकच त्याच्या लक्षात आले कि मी त्याच्या कडे बघत आहे. कोणतीही कसलीही लाज न बाळगता तो माझ्याकडे बघून इतका सुंदर हसला कि मला त्याचे खूप कौतुक वाटले.
            प्रसंग तसा अगदी ३ ते ४ मिनिटांचाच तरी देखील तो माझ्यासाठी खूप काही शिकवून गेला. सायकलचा पेडल तुटणे हे त्याचा साठी तसे एक प्रकारचे छोटेसे का होईना संकट होतेच म्हणायचं. तरीदेखील तो शांतपणे चीड चीड न करता त्याला सामोरे गेला. पेडल बसवण्यासाठी त्याची चालेली धडपड म्हणेज आलेल्या संकटाला तोडन देण्यासाठी त्याने केलेलं प्रयत्न. आणि खूप प्रयत्न करून देखील यश मिळत नाही म्हटल्या वर त्याने तो पेडल टाकून न देता बरोबर घेवून जाणेच स्वीकारले. एकंदरीतच काय मी हार मानायला तयार नाही, आत्ता माझ्या प्रयत्नांना यश मिळत नाही म्हणून काय झाले मी माझे प्रयत्न बंद करणार नाही.  जाताना त्याने दिलेले एक स्मितहास्य पाहून मला खूप छान वाटले. काहीही झाले तरी त्याला त्याची लाज वाटली नाही उलट ताठ मानेने केलेल्या प्रयत्नांची त्याला जाणीव होती आणि त्यामुळेच तो आनंदी होता. खूप सुंदर असा तो अनुभव होता. ३ ते ४ मिनिटांच्या वेळे मध्ये तो मित्र मला बरेच काही शिकवून गेला. सुंदर असा हा अनुभव आपल्या सर्वांबरोबर शेअर करू वाटला. त्याला यश मिळाले असेल नसेल हा पुढचा प्रश्न पण त्याने केलेल्या प्रयत्नांना, संकटाला सामोरे जाण्याच्या त्याच्या वाटेला आणि यश मिळाले नाही म्हणून प्रयत्न सोडून न देण्याच्या त्याच्या वृत्ती ला मनाचा सलाम

क्षितीज
२० सप्टेंबर २०१४